Saturday, September 12, 2009

संध्याकाळ

संध्याकाळ्च्या चहात आता ती मजा राहिली नाही,
तशी संध्याकाळही, मी पुन्हा कधी पाहिली नाही

मित्रांचा गराडा, वेफ़र्सचा चुराडा,
पाचकळ कोट्या, काही छोट्या, काही मोठ्या,
मारलेली टपली, निघालेली खपली,
त्या चहाची चव, आठवल्याशिवाय राहिली नाही,
तशी संध्याकाळही, मी पुन्हा कधी पाहिली नाही

मजा त्या canteenची, तिथे TVवर जाहिरात panteneची,
त्या बघितलेल्या match, त्यातले सोडलेले catch,
त्यांना घातलेल्या शिव्या, काही जुन्या, काही नव्या..
तशी खुमारी, तशी उभारी, मी पुन्हा कधी अनुभवली नाही,
तशी संध्याकाळही, मी पुन्हा कधी पाहिली नाही

ती केलेली पार्टी, त्याला आलेली कार्टी,
सगळेच इरसाल, सगळेच मस्तवाल,
कुणाला कशाला बोलायचं, सगळ्यांनी मिळून ’खोलायचं’
दुस-याला हिणवायची, एक संधी काही सोडली नाही,
तशी संध्याकाळही, मी पुन्हा कधी पाहिली नाही.

ते खेळलेले खेळ, ती भारलेली वेळ,
घेतलेली ’रिक्स’, आणि बसलेली सिक्स,
विजयाचा ओरडा, घसा पडलेला कोरडा,
विजयाच्या धुंदीत देखील, टिंगलटवाळी थांबली नाही
तशी संध्याकाळही, मी पुन्हा कधी पाहिली नाही


सामान सगळं भरून, सगळी सोपस्कार करून,
खोली केली रिक्त, मनच निघेना फक्त
ते ’घर’ सोडताना, मनाचेच मन मोडताना,
दृष्टी समोर होती, पण नजर मागे वळल्याशिवाय राहिली नाही,
तशी संध्याकाळही, मी पुन्हा कधी पाहिली नाही