Friday, October 20, 2006

जोक कसे सांगावे (किंवा... सांगू नये)

आधीच सांगुन ठेवतो, हा काही प्रबोधनपर लेख नाही. त्यामुळे वाचण्यास लाजू नये.पण काय आहे, मी पुण्याचा असल्यामुळे बहुधा, माझ्या शब्दांना आपोआप उपदेशाचा वास येतो. तर ते एक असो. आता मुख्य विषयाकडे वळू.
काही माणसं, जोक सांगण्याऎवजी कबुतरांना दाणे वगैरे का नाही भरवत? तेव्हढीच समाजसेवा तरी होईल. मी बरेचदा बघितलय, ही असली माणसं "आता मी तुम्हाला एक जोक सांगतो .. " अस म्हणुन जोरजोरात हसत सुटतात. बरं, थोडंथोडकं नाही, चांगली एक दोन मिनिटं हसत रहातात. ते म्हणतात ना, नमनाला घडाभर तेल, त्यातला प्रकार. हे पाहीलं की पहिलं जर काही होत असेल तर त्या जोक ऎकण्यामधला निम्मा interest निघून जातो.
बरं हेही एकवेळ चालेल, ह्या पुढची पिडा म्हणजे, हे असले लोक, " एकदा बरं का, एक सरदारजी त्याच्या मित्राबरोबर शिकारीला जातो." असं म्हणुन परत हसायला लागतात. अशा वेळी मात्रं संताप संताप होतो. म्हणजे आम्ही एवढे कानात प्राण आणुन तुमच्या त्या नवसाच्या जोकवर हसायची तयारी करणार, आणि हे आपले हर्षवायु झाल्यासारखे हसत सुटणार. आणि वर जसजसा जोक सांगत जातात, तसतसं त्यांच हसूही वाढत जातं. पुढेपुढे त्या हास्याच्या
फवा-यातनं शब्दं शोधून काढणंही मुश्किल होऊन बसतं.तेव्हा तर मला त्या जोक
सांगणा-याची गचांडी धरून सांगावसं वाटतं," अरे बाबा, आम्ही इथे तुझा जोक ऎकतोय, ते काही आम्हाला दुसरी कामं नाहीत म्हणुन नाही,तर थोडं हसू येईल ह्या आशेनं. आता आमच्या वाटचंही तू हसून घेतल्यामुळे,तू आणि तुझा जोक, ह्या दोघांचंही आम्हाला सोयरसुतक राहिलेलं नाही. तेव्हा आता कटा, आणि दुर्दैवाने पुन्हा भेटलाच, तर आमच्यावर उपकार करा, आणि पुन्हा जोक सांगू नका.." अर्थात हे सगळं मनात बरं का! उघड उघड आम्ही फक्त एव्हढच म्हणतो (म्हणजे, म्हणू शकतो!)," वा! वा! छान होता हं तुमचा (निम्मा न कळलेला) जोक!कुठून कुठून सुचतात तुम्हाला हे जोक, खरंच कमाल आहे बुआ तुमची!" कारण मनात आलेल्याच्या बरोब्बर उलट बोललो नाही, तर आपण मध्यमवर्गीय कसले!!
अजुन एक जात म्हणजे, जोक सांगुन झाल्यावर, तो समोरच्याला समजणं शक्यच नाही, अशी स्वतःची ठाम समजुत करून घेऊन, त्या जोकमधे, नक्की जोक कशात आहे, हे समजाऊन सांगणारी माणसं. आपला जोक ऎकायला सगळे निर्बुधं लोक जमले आहेत, असं ह्यांना का वाटतं कोण जाणे!! त्यातुन जर तो जोक खरच चांगला असेल, तर अजुन चिडचिड होते. अरे, आम्हाला नाही कळला जोक, तर आम्ही विचारू ना!लगेच तुमचं त्या जोक वर निरुपण कशाला?
वरील दोन्ही जातींपेक्शा, जरा सौम्य असलेली अजुन एक जात आहे. ह्या लोकांचा जोक सांगुन संपला तरी तो संपल्याचं कळतच नाही.पुढची दोन तीन सेकंद काही शब्दं ऎकू आले नाहीत, ह्याचा अर्थ 'जोक संपला' असा आपण घ्यायचा असतो,व जमल्यास हसायचही असतं. म्हणजे, जोक कधी कधी चांगलाही असतो, पण अशी मणसं जोक सांगताना सतत वाटत राह्तं की आता पुढच्या वाक्याला जोक संपून आपल्याला हसू येईल, व आपण त्या वाक्याची वाट बघत बसतो. आणि हे लोक त्या जोकची punchline सुद्धा आधीच्याच टोन मधे सांगुन मोकळे होतात,व आशेने आपल्याकडे बघत बसतात, की आता कधी एकदा हसताय तुम्ही!! पण अशा मणसांचा राग येत नाही, कारण तुम्हाला हसवण्याचा त्यांचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिक असतो.
आता जोक कसे सांगू नये, हे पाहील्यानंतर, चांगले जोक कसे सांगतात हे बघुया.
जोक रंगण्यासाठी खुप महत्वाच असतं, ते त्या जोकचं timing. म्हणजे, तो जोक विषयाला धरुन असेल, तर नक्कीच अधिक रंगतो. चांगला जोक सांगणारा, स्वतः जोक सांगताना फारसा हसत नाही. विशेषतः, जोकमधे कुणाची खिल्ली उडवायची असेल, तर चेहरा गंभीर ठेवणच जास्ती चांगलं. जोकच्या climax पर्यंत उत्साह वाढवत नेऊन punchlineच्या जरासं आधी, तो थोडासा pause घेऊन, सर्वं श्रोते त्याच्याकडे आतुरतेने बघताहेत, हे बघुन, मग तो punchline सांगतो, आणी मग काय, जोक चांगला असेल तर हास्यस्फोट ठरलेला!!!
हे जे काही मी वर लिहीलं आहे, ती केवळ माझी स्वतःची मतं नसून निरीक्शणंही आहेत.तुम्हाला पटली, आवडली, तर हसा, नाहीतर 'अजुन एक पुणेरी लेख', असं म्हणुन सोडुन द्या.. ह्यापुढे तुमच्या प्रत्येक जोकवर श्रोते भरभरून हसोत, अशी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना करून, मी हा blog संपवतो.
happy joking!!

1 Comments:

At 4:28 AM, Blogger Prasad Chaphekar said...

very true.. khraxh.. hi jaat rahili lihaychi.... yacha karaN bahuda he asel ki swataha me tya jatimadhla asawa!! :D :D

 

Post a Comment

<< Home