Tuesday, December 19, 2006

पसरा आणि पसारा..

ह्या लेखाचं नाव हे केवळ नाव नसून माझ्या आजवरच्या "जिनगानी"चं ( खरं तर "जीवनगाणे " लिहिणार होतो, पण मग ते अगदीच सखाराम गटणे वाटलं असतं म्हणून...)ब्रीदवाक्य आहे.किंवा माझ्या खोलीचं ब्रीदवाक्य आहे असं म्हणा हवं तर. आजवर मी जी काही बोलणी खाल्ली आहेत, त्यातली निम्मी मी खोली अस्ताव्यस्त असण्याबद्दल खाल्ली आहेत.आधी वाटायचं, की ही खोलीच चुकीची बांधली आहे. म्हणजे, इथे सगळ्या गोष्टी ठेवायच्या जागा फार लांब लांब आहेत.पण मग नंतर एकदा खोली बदलून बघितलं. त्या पण खोलीची जेव्हा आधीसारखीच गत झाली तेव्हा कळलं की प्रॉबलेम आपल्यातच आहे.वास्तविक घरच्यांनी चांगली २ कपाटं, व एक ६ ड्रॉवरचं टेबल त्या खोलीत आणून टाकलं होतं.त्यामुळे सामान ठेवायला इतकी जागा झाली की मी सर्वात जास्ती जवळ असलेल्या कप्प्यात हातातलं सामान ठेवायला लागलो.त्यामुळे गोंधळ कमी व्हायच्या ऎवजी वाढलाच.कुठलाही कप्पा उघडताना अलीबाबाची गुहा उघडताना यावं तसलं फीलिंग यायला लागलं मला.पण तरीही गंमत अशी की शोधायला घेतलेली वस्तू ब-याचदा सापडायचीच. मी न सापडणा-या वस्तू आधी आईला शोधायला सांगायचो. पण ते महागात पडायला लागलं.कारण मला एखादा ड्रॉवर चार-चारदा धुंडाळूनही न सापडलेली वस्तू आई माझ्यासमोर त्याच ड्रॉवर मधनं काढून दाखवायची. मग काय त्यानंतर अव्यवस्थितपणा व वेंधळेपणा ह्या दोन्ही गोष्टींवरून एकदम बोलणी बसायची.फारच चिडली तर ती स्वतःच माझी खोली आवरायची.मग काय, मला एकही वस्तू सापडायची नाही, व सारखं तिला विचारायला लागायचं. पुढे पुढे मी ह्या प्रकाराचा धसका घेतला, व ज्या सापडायलाच पाहिजेत अशा वस्तू तरी सुरक्षित जागी ठेवायला लागलो. लक्षात घ्या, मी " सुरक्षित " म्हटलंय, " व्यवस्थित" नाही.पण एवढे कप्पे असूनही असंख्य वस्तू व खूप सारे कागद माझ्या त्या टेबलावर बापुडवाण्या अवस्थेत पडलेले दिसतात.मी जेव्हा माझी खोली आवरतो,( ह्या क्रियेसाठी इंग्लिश मधला " once in a blue moon" हा वाक्प्रचार वापरायला काहीच हरकत नाही.)तेव्हा घरच्या रद्दीमधे निदान २-३ किलोंची तरी भर पडते.
मी खोली आवरल्यावर किमान २-३ दिवस तरी ती स्वछ वाटते.नंतर हळूच एकेक वस्तू आपापली जागा सोडायला लागते.स्वतःच्याच नकळत स्वतःची खोली पसरण्याच्या क्रियेमधे मी जवळ जवळ mastery केली आहे. म्हणूनच मी फारसा कधी मॆत्रीणिंना घरी वगैरे बोलावत नाही( आम्ही लाख बोलावलं तरी कुठली मैत्रिण येणार आहे आमच्याकडे!!).
सध्या शिक्षणासाठी बाहेर रहात असल्यामुळे जेव्हा घरी येतो आणि माझ्या खोलीतले ड्रॉवर उघडतो तेव्हा मला एकदम nostalgic व्हायला होतं. आपण इतकी टाकून दिली, तरी अजुन एवढी मोडकी पेनं, आणि त्यांच्यापैकी एकालाही फिट न बसणारी टोपणं, हे सगळं आपण कधी गोळा केलं असा प्रश्न पडतो.मग त्या पेनांपाठोपाठ मोडक्या पट्ट्या, करकटक( तेही मोडकंच!) , न चालणारी sketchpens ,एक भिंग, एखादं पेपरवेट, जुने-पुराणे चष्मे, असला एकमेकाशी काहीही संबंध नसलेला ऎवज बाहेर पडतो. And I feel right at home!!

तेव्हा माझी ओळख कोणाला एकाच शब्दात हवी असेल तर मला हा एकच शब्द योग्य दिसतोय..


अस्ताव्यस्त!!!

6 Comments:

At 8:49 AM, Blogger Tulip said...

>>> की ही खोलीच चुकीची बांधली आहे..

rofl.. post ekdam hhpv:))

 
At 3:55 PM, Anonymous Anonymous said...

Sahi..good man ;-)

 
At 9:11 AM, Blogger Sumedha said...

छान :-)

 
At 10:19 AM, Blogger Shashank Kanade said...

aamchya ghari hi aslach prakar.
gharoghari pasaryachich kapaate, dusre kaay!!!

 
At 10:33 AM, Anonymous Anonymous said...

मला माज्याच खोलीचे वर्णन वाटले. I love my अस्ताव्यस्त room. मी जेव्हा अशी pasaryachya खोलीत पसरलेली असते, तेव्हाच मला स्वतंत्र आणि बिनधास्त वाटते.

 
At 8:28 AM, Blogger Ishani... lyfs beautiful*(conditions apply) said...

@prasad, tanishka, shashank:

ay khaarach he aaplyach kholicha varnaan vatta na??!! maasta..... tu tari once in blue moon avarlyavaar 3-4 diwsanne pasara vhaicha...... mazyagharee tar doan taasatach hoto.... ani paasara asel ki kasa ya kholit konitari raahta yachi janeev tari aaste.....
ani relly...... mag konala gharee bolavta yet nahi....
punha ekda
far far far bharee leehlai

 

Post a Comment

<< Home