Sunday, December 24, 2006

मी टी.व्ही.वर झळकतो.....

वाचून आश्चर्य वाटलं ना? मी? आणि टी.व्ही.वर? काहीतरी काय? पण चमत्कारांवरच दुनिया चालते म्हणतात ना? ते अगदी खरं आहे.खरोख्ररच अस्मादिकांचा चेहरा टी.व्ही.वर झळकलेला आहे( हिमेश ने "झलक दिखलाजा" हे मलाच उद्देशून तर म्हटले नसेल ना?). किंवा पाठ झळकलेली आहे असं म्हणूया हवं तर. नाही कळलं ना? थांबा, मी जरा नीट समजाऊन सांगतो.

आमचे एक स्नेही टी.व्ही. सीरीयल्स मधे काम करतात. एकदा त्यांना भेटायला आम्ही शूटींगच्या लोकेशनवर गेलो होतो. मला वाटतं,दूरदर्शन वरच्या " वीर सावरकर" ह्या मालिकेमधल्या एका एपिसोडचं शूटींग होतं. मदनलाल धिंग्रा एका इंग्रज अधिका-याचा खून करतात तो सीन होता.एका पार्टीमधे हा प्रसंग घडतो. तेव्हा पार्टीचा सेट लावला होता.स्नेह्यांनी आमची दिग्दर्शकांशी ओळख करून दिली.
मदनलाल धिंग्रा पार्टीमधे प्रवेश करतात तो सीन होता.तेव्हा पार्टीमधे गर्दी वाटावी म्हणून दोघ-तिघांना हॉल मधून बाहेर पडताना दाखवावं असं दिग्दर्शकांचं मत पडलं.आम्ही ( म्हणजे, मी आणि माझे बाबा) तिथेच उभे होतो. त्यांनी आम्हाला सहज विचारलं ," तुम्ही करता का हे काम?" आम्ही अर्थातच 'हो' म्हटलं. झालं, लगेच आम्ही कुठला पोषाख घालावा हा शोध सुरू झाला.इंग्रजांची पार्टी असल्याने, आम्हाला दोन कोट मिळाले.पण अजुन एक प्रॉबलेम आलाच. मी नेमक्या पायात चपला घातल्या होत्या. आता वर कोट, आणि खाली चपला? त्यामुळे माझ्यासाठी फॉर्मल बूटांचा शोध सुरू झाला.मी इथे मनातल्या मनात शंभरदा तरी कपाळ बडवलं असेल.बूटापायी आपला हा 'चानस' जातो की काय असं वाटायला लागलं.शेवटी बूट न सापडल्याने, दिग्दर्शकांनी ," ह्यांचे पाय फ्रेम मधे येणार नाहीत असं शूटींग घ्या." असं सांगितलं.
चला! म्हणजे अखेर आम्ही येणार तर कॅमेरापुढे!!आम्हाला काम म्हटलं तर अगदीच नगण्य होतं. दिग्दर्शकांनी 'action' म्हटलं की त्या हॉलच्या दारातून त्यांनी सांगितलेल्या दिशेने कॅमेराच्या फ्रेम मधून बाहेर जाईपर्यंत चालत जायचं, एवढंच होतं. पण तरीही उगीचच छातीत धडधड व्हायला लागली.( एकही संवाद नव्हता,तरीही)आवाज खोल गेला.श्वास गुदमरायला लागला, सर्वांगाला घाम फुटला.थोडक्यात सांगायचं, तर ह्रदयविकाराची सगळी लक्षणे माझ्यात एकदम दिसायला लागली. त्या सीनची एक-दोनदा रीहर्सल झाली. तरीही माझ्या conditon मधे काही फारसा काही फरक पडेना. मी तसाच भांबावल्यासारखा ( म्हणजे नेहमीसारखा) इकडे तिकडे बघत होतो. तरी बरं, कॅमेरा माझ्या मागच्या बाजुने होता. शेवटी एकदाचे दिग्दर्शकांनी 'action' म्हटले बुआ.आणि माझ्या सुदैवाने तो सीन पहिल्याच टेक मधे ओके झाला.मी 'हुश्श' म्हणत पहिल्यांदी तो कोट अंगावरून खाली उतरवला.आयुष्यातला माझा पहिला टी.व्ही.वरचा सीन!

पण त्यामुळे मी आता 'टी.व्ही.वर झळकलेला नवा उमदा चेहरा" अशी माझी ओळख करून देऊ शकतो.पुढे-मागे वधु-वर सूचक मंडळात नाव घालायची पाळी आलीच, तर माझ्या profileमधे "टी.व्ही. सितारा" असं घालायला मी मोकळा आहे. किंवा "सूर्य पाहिलेला माणूस" ह्या धर्तीवर " ज्याची पाठ टी.व्ही. कॅमेराने बघितली आहे असा माणूस" असाही उल्लेख करता येईल. काय, कशी आहे कल्पना?



3 Comments:

At 12:03 AM, Blogger Shashank Kanade said...

sangitla nahis kadhi ha kissa!
bara zala blog var taklas te!
he he he
maja aali

 
At 10:32 PM, Anonymous Anup said...

class arey... sahi lihitoys

 
At 12:07 PM, Blogger yogeshkumkar said...

Nice blog...I enjoyed reading...
I had same experience on Korean TV program in korean language, first few minutes were fine, ofcourse after 6 rehersals....and then everything goes well and want to go on...

 

Post a Comment

<< Home