Wednesday, May 19, 2010

साक्ष..

" काय रे, तुला काय वाटतं? तुच सांग कोण बरोबर?" हे वाक्य ऎकलं की मला धडधडायला लागतं. कारण बहुतेक वेळेला ह्या वाक्यानंतर आई किंवा बाबा, कोणाच्या तरी बाजूने बोलायाला लागतं. त्यांच्या भांडणात हा माझ्यासाठी सर्वात भितीदायक प्रकार. आईच्या बाजूने बोललं, तर बाबा म्हणतात ," तुला रोज सकाळी डबा लागतो ना, तू तिच्याच बाजूने बोलणार." आता वास्तविक आई त्यांना पण इतकी वर्षं डबा करून देत आहे ह्याचा त्यांना सोईस्कररित्या विसर पडतो. बरं बाबांच्या बाजूने बोललं, तर आई म्हणते, " हो, बाप लेक एकत्र येणारच. दोघेही गबाळे एकमेकांना पाठिंबा देतात." (त्यांची भांडणं ही बहुतेक वेळेला काहीतरी काम विसरल्यावरून, किंवा करायचा आळस केल्यावरुन होतात.) आता मान्य आहे , की मी गबाळा आहे. अगदी मान्य आहे. पण त्याचा ह्या भांडणाची काय संबंध? हल्ली हल्ली मी सरळ असं काही व्हायला लागलं की सरळ ," ते तुमचं तुम्ही बघा. उगाच माझी साक्ष काढू नका." असं सांगतो. पण तोही उपाय दरवेळी यशस्वी होत नाही. मी गप्प बसलो म्हणजे माझी विरुद्ध बाजुला सहानुभूती आहे असा दोघेही समज करून घेतात. आणि मग ," एवढं सगळं ऎकतोयस ना? मग जरा मत द्यायला काय होतं?" हे ऎकायला लागतं. मग ते भांडण त्रिकोणी व्हायला लागतं. जी एकुलती एक मुलं आहेत त्यांना मी काय म्हणतोय हे लगेच कळेल. भावंडं असलं तर सोईस्कर विभागणी तरी करता येते. एक भावंडं आईच्या बाजूने आणि एक बाबांच्या. एकटं असलं ही सोय नाही.
त्यातून आई एकदा ओरडायला लागली की मागच्या सगळ्या अपराधांची उजळणी होते. मी आईला किती वेळा सांगितलंय ," मी आत्ता काय चूक केली आहे त्यावरून ओरड. आधीच्या चुकांबद्दल झालंय आधीच झालंय ओरडून. परत परत नाही ओरडायचं त्याच चुकीवरून." तर माझ्या ह्या विधानावरच आक्षेप घेऊन त्यावरून बोलणी सुरू होतात. ह्या सर्वावरून तुम्हाला असं वाटणं सहाजिक आहे की जणू माझे खूप हाल होत आहेत. तसं काही नाहीये, ओरडण्यासारखी परिस्थिती मीच निर्माण करतो हे नाकबूल करून चालणार नाही. पण म्हणून हे काय!!

4 Comments:

At 9:05 PM, Blogger yogesh said...

Chala.. 6 mahinyantar 1 post.. :)

 
At 5:55 PM, Blogger Shashank Kanade said...

चाफ्या, तुझं लग्न झाल्यावर सम [०,२,४२ वगैरे] मुलं पैदा कर हो!

 
At 5:53 AM, Blogger Mann Ki Baat said...

agdi mazhya manatla bollas!!

 
At 10:24 PM, Blogger Shubhangee said...

दोन मुले देखील एकाच पक्षाची बाजू घेतात कारण त्यावरुन त्या मुलांत भांडणे होतात. आई वडीलांच्या भांडणात मुलांची गोची होते हे मात्र नक्की. काही अपवाद सोडल्यास भांडणे वाटतात तितकी कधीच सिरीयसली घ्यायची नसतात(मुलांनी).जेवणाइतकी ती देखील संसाराला आवश्यक असतात.

 

Post a Comment

<< Home