अभ्यास...
कुणी सांगेल का मला, नक्की कसा आणि किती अभ्यास केला की परिक्षेच्या आधी सारख्या (लघु)शंका येत नाहीत ?ती गोष्ट नव्हती का, सुखी माणसाच्या सद-याची, तसा मी वर उल्लेखलेली गोष्ट करून दाखवणा-या माणसाच्या शोधात आहे.नाही, अर्थात त्याचं श्रेय माझ्याकडेच आहे. कारण परिक्षेच्या आधी अर्धा तास जर मी गाणी लावून नाचत बसलो, तर "पेपर अवघड काढला" म्हणून सरांना बोल कशाला लावयचा?शाळेत पेपर हातात पडतेवेळी माझा हात घामाने भिजून ओला झालेला असायचा.त्यामुळे झाला तर फायदा एवढाच व्हायचा, की ऎन उन्हाळ्यात जरी पेपर असला तरी मला अजिबात उकडायचं नाही. पुढे पुढे वय वाढलं, तसं पेपरचं टेंशन कमी व्हायला लागलं. पण ह्याचं कारण माझे अभ्यास करणं वाढलं म्हणून नव्हे, तर कोडगेपणा वाढला हे होतं.
इंजिनीयरिंग मधे A.T.K.T. नामक अफलातून प्रकार आम्हा विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून यायचा. A.T.K.T म्हणजे ' तुम्ही कितीही नापास व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत' असं पुणे युनिव्हर्सिटीचा संदेश होता. सुदैवाने मला त्याची गरज कधीही भासली नाही.
लहानपणी माझा गणिताचा अभ्यासाचा सर्वसाधारणपणे क्रम असा असायचा. बाबा मला ५ गणितं द्यायचे व सांगायचे, "ही पाचही बरोबर सोडवलीस, तर तुझा अभ्यास झाला. ह्यातल्या प्रत्येक चुकलेल्या गणितामागे परत नवी ५ गणितं सोडवायची". आता कोणीही मुलगा, अशा परिस्थितीत ती पाचही गणितं बरोबर सोडवून मोकळा झाला असता की नाही? पण हे जमलं असतं तर दुसरं काय हवं होतं?मी एकाही दिवशी किमान १५ गणितं सोडवल्याशिवाय सुटल्याचं आठवत नाही.
इंजिनीयरिंग करताना बाबा नेहमी सांगायचे ( म्हणजे ते तसे आताही सांगतात) ," तू एकदा तरी मान मोडून अभ्यास कर रे. तुला किती मार्क पडतील त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. फक्त एकदा खूप अभ्यास करताना दिसू दे रे आम्हाला." needless to say, मी आजवर त्यांची ही अपेक्षा पूर्ण करू शकलेलो नाही.आता तर काय, मी hostelवर रहात असल्यामुळे ते फोनवर सांगण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत.मी फक्त ऎकून घेतो आणि हो हो म्हणतो. त्यावरून मला एक गमतीदार इंग्लिश वाक्य आठवतंय "By the time I started to realize that my father was right, my son started telling me that I was wrong." नाही, म्हणजे मला मार्क नेहमी चांगलेच पडतात, पण आता त्याबद्दल काही वाटेनासं झालं आहे.कारण ते मिळवण्यासाठी मी अगदीच तुटपुंजी मेहनत घेतलेली असते.बाबा म्हणतात त्याप्रमाणे एकदातरी मान मोडून अभ्यास करून सोन्यासारखं लखलखीत यश बघायची खूप इच्छा आहे,बघू आता परमेश्वर कधी तशी बुद्धी देतो ते.. ( म्हणजे, इथे सुद्धा आम्ही सगळा भार परमेश्वरावर सोपवून मोकळे!!...)
1 Comments:
Working long hours is not working hard...Me ekach mhanen...look at the big picture!
Post a Comment
<< Home