Tuesday, November 07, 2006

भाषाप्रभुत्व

मी काही अफ़लातून लोकांना ओळखतो.नाही म्हणजे, ते ही मला ओळखतात. तसं काय मी अटल बिहारी वाजपेयींना ही ओळखतो. ते जाऊ दे. तर मुद्दा हा आहे, की ते अफलातून का आहेत? हे त्यांच्याशी बोलल्याशिवाय नाही कळायचं. मी बोललो आहे, म्हणुन मला कळतं.
हे सगळे लोक, अफलातून हिंदी बोलतात.किंवा, असं म्हणुया की, हिंदी अफलातून बोलतात.
आता नमुन्यादाखल हे काही संवाद बघा.ह्यातला एक मुलगा अस्सल मराठी आहे, तर दुसरा अस्सल हिंदी.
स्थळ: college canteen वेळ: लंच टाईम
मराठी: " अरे, ये क्या? तुमने डबे में सिर्फ इतनी ही भाजी लाये हो?"
हिंदी: "अरे, मेरे लिए इतनी काफ़ी है."
मराठी: " तुम्हे इतनी भाजी कैसे पुरती है? मेरी तो उरती है...."

हा संवाद ऎकल्यावर, मी अक्षरशः खुर्चीवरून हसता हसता खाली पडलो. त्याच मित्राचे असे अनेक किस्से आहेत. आता हे अजुन एक वाक्य बघा.

"अरे, क्या बारिश हो रही है यार, मैं तो पुरा ओला हो गया. अब मुझे कोरडा होने में बहुत टाईम लगेगा."

लोकहो, ही केवळ माझी कल्पनाशक्ती नसून खरोखरचा किस्सा आहे.परवाचीच गोष्ट आहे, मी मित्रांबरोबर सिनेमा बघत होतो. त्यातला एक सीन बघून एक मित्र म्हटला," अरे देखो ना, वो कैसी दचक गयी!!!"

पण ह्या सर्वांपेक्षा महान किस्से आहेत. आमचे एक स्नेही काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते.बरंच सामान होतं. एअरपोर्ट वर सामान उचलायला porter आला. तर हे त्याला म्हटले," अरे, सब सामान एक साथ मत उठाओ, दो-तीन हेलपाटे मारो." porter म्हटला, "क्या मारू?". "अरे हेलपाटे हेलपाटे. " त्यावर porter उत्तरला, " साब, मैं मारामारी नहीं करता!!"

एकदा एक बाई तिचं पोतं एका दुकानासमोर ठेऊन गेली. थोड्या वेळानी परत येऊन बघते तर पोतं गायब! तिने दुकानदाराला विचारलं ," मेरा पोता कहा गया?" आता हिन्दीमधे 'पोता' चा काय अर्थ होतो आपल्याला माहिती आहे. तो दुकानदार म्हटला," मुझे क्या मालूम?" "अरे ऎसे कैसे, मैं यहीं तुम्हारे दुकान के सामने रखके गयी थी उसे." " अरे कैसी औरत हो तुम? अपने पोते को कोई ऎसे छोड जाता है क्या?" " तो क्या हर पल उसे साथ रखके चलू?" ब-याच वेळानी दुकानदाराला कसंबसं कळलं तिला नक्की काय म्हणायचय ते. त्यानी ते पोतं तिला परत दिलं आणि वैतागून ," इसको बोरी कहते है बोरी. पोता नहीं. " असं म्हणत म्हणत तिला निरोप दिला!!

अशुद्ध भाषा बोलणा-यांवर माझा राग नाही.लहानपणापासून जिभेचं वळण जसं असेल तसं माणूस बोलणार. त्यात काही गैर आहे असं नाही.पण जेव्हा ही लोकं 'भाषेचा उपयोग समोरच्याला आपलं म्हणणं कळावं ह्यासाठी असतो. तुम्हाला आम्ही काय म्हणतो ते कळलं की झालं. भाषा शुद्ध आहे का अशुद्ध ह्याला काय महत्व?' असं अशुद्ध भाषा बोलण्याचं निर्लज्ज समर्थन करतात तेव्हा मात्र डोक्यात संतापाची तिडीक जाते. असंच असेल तर हे लोक त्यांच्या वडलांना सरळ तोंडावर 'बाप' असं का नाही म्हणत? आजोबांना 'थेरड्या' असं का नाही म्हणत? त्यांना आपण बोलावतोय हे कळलं की झालं. त्या हिशेबानी 'बाबा' आणि 'बाप' सारखंच, 'आजोबा' आणि 'थेरड्या' सारखंच, नाही का? पण नाही. आपण त्यांचा आदर करतो म्हणुन आपण त्यांना आदराने बोलावतो. तसंच भाषेचा अनादर होऊ नये म्हणुन ती शुद्ध बोलावी.अर्थात हे माझ स्वतःचं मत आहे. तुमचं ह्यावर काय मत आहे ते खाली comments मधे लिहुन कळवालंच. नमस्ते!