Thursday, July 08, 2010

वर्गलढा

एकदा आमच्या क्लासमधे,
मुलं जरा जास्ती झाली,
एवढी सगळी मुले आता,
कुठल्याच वर्गात मावेना झाली.

बॅचेस जास्ती, वर्ग कमी,
सोडवायचा कसा हा तिढा,
कार्ल मार्क्सला म्हटलं मी,
’अरे, हाच खरा वर्गलढा’
-प्रसाद

पुनश्च हरि ओम

१५ जुलै! अजून एका नविन ईनिंगची सुरवात! IIT कानपूर सोडल्यानंतर बरोबर २ वर्षांनी पुन्हा IITवासीयाचे जीवन सुरू करणार.. Ph.D. चा विद्यार्थी म्हणून.. लोकांनी ऐकलं की म्हणतात, चाफ्या, तुझे नक्की काय चालू आहे? जरा आमच्या वाटचं पण शिकून घे ना.. कधी UPSC करणार म्हणतोस, आता हे काय नविन? नविन काही नाही. जर दुर्दैवाने UPSC मधे पास झालो नाही तर ISRO किंवा DRDO मधे काम करायची इच्छा आहे, आणि त्यासाठी पुढचं शिक्षण थांबवून चालणार नाही..

दोन्ही अभ्यास कसे झेपणार? कोणास ठाउक? पण झेपतील असं वाटतंय. ह्यामागचं कारण असं असावं की UPSC मधे ह्यावेळी history व Political science हे विषय निवडले आहेत. त्यामुळे तिथे टेक्निकल अभ्यास नाहीये. म्हणजे Ph.D. चा अभ्यास करून कंटाळा आला की UPSC चा करायचा, किंवा उलटं! काय arbit पुस्तकं वाचतोय मी! B.E. किंवा M.Tech करताना, मी कधी "Foundations of Indian Political Thought" अशा नावाचं पुस्तक वाचीन हे कधी स्वप्नात सुध्दा वाटलं नव्हतं. पण मजा येते. मनू, व्यास, वाल्मिकी, कौटिल्य, शुक्राचार्य ह्यांचे राजकीय विचार वाचताना मजा पण येते व अभ्यास पण होतो. राजा अथवा प्रजा, कोण सार्वभौम आहे, ह्याचे निरंतर चिंतन दिसून येते... पण ते एक असो. तो मुख्य विषय नाही.

पुन्हा विद्यार्थीदशेला सुरवात करताना, खूप वेगळं वाटतंय. माहित नाही का, पण भारी वाटतंय. आता अधून मधून घरच्यांचे टोमणे ऐकून घ्यावे लागतात, ’ इतका मोठा झालास, तेव्हाच नोकरी केली असतीस तर एव्हाना लग्न पण झालं असतं'.. ई. ई.. (non-committed लोकांना मी काय म्हणतोय त्याची तीव्रता अधिक जाणवेल.. :) )
पण चलता है!.. पुढे सगळं चांगलं होणार आहे, ह्यावर आज चालत रहायचं, नुसतं चालायचं नाही, हव्या त्या ठिकाणी पोचायचे सडकून प्रयत्न करायचे ह्याशिवाय काय असतं आपल्या हातात, आय मीन, पायात?