Thursday, October 26, 2006

अफ़लातून पु.ल.

पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद

" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज खाली येतो की नाही बघ."

च्यायला!! हे इतकं सोप्पं असत हे माहितच नव्हतं आम्हाला!!! जय पु.ल.!!!

Friday, October 20, 2006

जोक कसे सांगावे (किंवा... सांगू नये)

आधीच सांगुन ठेवतो, हा काही प्रबोधनपर लेख नाही. त्यामुळे वाचण्यास लाजू नये.पण काय आहे, मी पुण्याचा असल्यामुळे बहुधा, माझ्या शब्दांना आपोआप उपदेशाचा वास येतो. तर ते एक असो. आता मुख्य विषयाकडे वळू.
काही माणसं, जोक सांगण्याऎवजी कबुतरांना दाणे वगैरे का नाही भरवत? तेव्हढीच समाजसेवा तरी होईल. मी बरेचदा बघितलय, ही असली माणसं "आता मी तुम्हाला एक जोक सांगतो .. " अस म्हणुन जोरजोरात हसत सुटतात. बरं, थोडंथोडकं नाही, चांगली एक दोन मिनिटं हसत रहातात. ते म्हणतात ना, नमनाला घडाभर तेल, त्यातला प्रकार. हे पाहीलं की पहिलं जर काही होत असेल तर त्या जोक ऎकण्यामधला निम्मा interest निघून जातो.
बरं हेही एकवेळ चालेल, ह्या पुढची पिडा म्हणजे, हे असले लोक, " एकदा बरं का, एक सरदारजी त्याच्या मित्राबरोबर शिकारीला जातो." असं म्हणुन परत हसायला लागतात. अशा वेळी मात्रं संताप संताप होतो. म्हणजे आम्ही एवढे कानात प्राण आणुन तुमच्या त्या नवसाच्या जोकवर हसायची तयारी करणार, आणि हे आपले हर्षवायु झाल्यासारखे हसत सुटणार. आणि वर जसजसा जोक सांगत जातात, तसतसं त्यांच हसूही वाढत जातं. पुढेपुढे त्या हास्याच्या
फवा-यातनं शब्दं शोधून काढणंही मुश्किल होऊन बसतं.तेव्हा तर मला त्या जोक
सांगणा-याची गचांडी धरून सांगावसं वाटतं," अरे बाबा, आम्ही इथे तुझा जोक ऎकतोय, ते काही आम्हाला दुसरी कामं नाहीत म्हणुन नाही,तर थोडं हसू येईल ह्या आशेनं. आता आमच्या वाटचंही तू हसून घेतल्यामुळे,तू आणि तुझा जोक, ह्या दोघांचंही आम्हाला सोयरसुतक राहिलेलं नाही. तेव्हा आता कटा, आणि दुर्दैवाने पुन्हा भेटलाच, तर आमच्यावर उपकार करा, आणि पुन्हा जोक सांगू नका.." अर्थात हे सगळं मनात बरं का! उघड उघड आम्ही फक्त एव्हढच म्हणतो (म्हणजे, म्हणू शकतो!)," वा! वा! छान होता हं तुमचा (निम्मा न कळलेला) जोक!कुठून कुठून सुचतात तुम्हाला हे जोक, खरंच कमाल आहे बुआ तुमची!" कारण मनात आलेल्याच्या बरोब्बर उलट बोललो नाही, तर आपण मध्यमवर्गीय कसले!!
अजुन एक जात म्हणजे, जोक सांगुन झाल्यावर, तो समोरच्याला समजणं शक्यच नाही, अशी स्वतःची ठाम समजुत करून घेऊन, त्या जोकमधे, नक्की जोक कशात आहे, हे समजाऊन सांगणारी माणसं. आपला जोक ऎकायला सगळे निर्बुधं लोक जमले आहेत, असं ह्यांना का वाटतं कोण जाणे!! त्यातुन जर तो जोक खरच चांगला असेल, तर अजुन चिडचिड होते. अरे, आम्हाला नाही कळला जोक, तर आम्ही विचारू ना!लगेच तुमचं त्या जोक वर निरुपण कशाला?
वरील दोन्ही जातींपेक्शा, जरा सौम्य असलेली अजुन एक जात आहे. ह्या लोकांचा जोक सांगुन संपला तरी तो संपल्याचं कळतच नाही.पुढची दोन तीन सेकंद काही शब्दं ऎकू आले नाहीत, ह्याचा अर्थ 'जोक संपला' असा आपण घ्यायचा असतो,व जमल्यास हसायचही असतं. म्हणजे, जोक कधी कधी चांगलाही असतो, पण अशी मणसं जोक सांगताना सतत वाटत राह्तं की आता पुढच्या वाक्याला जोक संपून आपल्याला हसू येईल, व आपण त्या वाक्याची वाट बघत बसतो. आणि हे लोक त्या जोकची punchline सुद्धा आधीच्याच टोन मधे सांगुन मोकळे होतात,व आशेने आपल्याकडे बघत बसतात, की आता कधी एकदा हसताय तुम्ही!! पण अशा मणसांचा राग येत नाही, कारण तुम्हाला हसवण्याचा त्यांचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिक असतो.
आता जोक कसे सांगू नये, हे पाहील्यानंतर, चांगले जोक कसे सांगतात हे बघुया.
जोक रंगण्यासाठी खुप महत्वाच असतं, ते त्या जोकचं timing. म्हणजे, तो जोक विषयाला धरुन असेल, तर नक्कीच अधिक रंगतो. चांगला जोक सांगणारा, स्वतः जोक सांगताना फारसा हसत नाही. विशेषतः, जोकमधे कुणाची खिल्ली उडवायची असेल, तर चेहरा गंभीर ठेवणच जास्ती चांगलं. जोकच्या climax पर्यंत उत्साह वाढवत नेऊन punchlineच्या जरासं आधी, तो थोडासा pause घेऊन, सर्वं श्रोते त्याच्याकडे आतुरतेने बघताहेत, हे बघुन, मग तो punchline सांगतो, आणी मग काय, जोक चांगला असेल तर हास्यस्फोट ठरलेला!!!
हे जे काही मी वर लिहीलं आहे, ती केवळ माझी स्वतःची मतं नसून निरीक्शणंही आहेत.तुम्हाला पटली, आवडली, तर हसा, नाहीतर 'अजुन एक पुणेरी लेख', असं म्हणुन सोडुन द्या.. ह्यापुढे तुमच्या प्रत्येक जोकवर श्रोते भरभरून हसोत, अशी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना करून, मी हा blog संपवतो.
happy joking!!

Thursday, October 19, 2006

मी मोहन आगाशेंना भेटतो.....

तुम्ही कधी खुप ऊंच ६ फ़ुटी माणूस बघितला आहे?? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे?? असा खुप ऊंच ६ फ़ुटी माणुस कसा असेल?? पण मी बघितला आहे. तो माणुस म्हणजे, Dr. मोहन आगाशे!!
आता माझी भेट कशी झाली ते सांगतो. माझ्या मावशीचे यजमान, Dr. हर्षे, हे मोहन आगाशेंचे पट्टं विद्यार्थी. जेव्हा माझा मावसभाऊ पुण्यात आला तेव्हा मी त्याच्याबरोबर त्यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळेस ते बी.जे. college चे psychiatry deparment चे HOD होते. आम्ही दोघं त्यांच्या केबीन मधे गेलो. माझ्या भावाला त्यांना मेडीकलच्या admission संबंधी काही सल्ला हवा होता. गेल्या गेल्या ते आमच्याकडे बघुन इतके मस्त हसले, की काय सांगू!!!!
आमच्या थोड्या गप्पा झाल्या. तेव्ढ्यात त्यांना कोणाचा तरी फ़ोन आला. तो अजब संवाद वाचा आता..
"hello, मोहन आगाशे here."
पलीकडल्या माणसाला बहुतेक त्यांची appointment हवी होती. तेव्हा त्याने ' तुम्हाला भेटायला कुठे येऊ?' असा प्रश्नं विचारला.
"तुम्हाला ससून माहिती आहे ना? मग असं करा, त्याच्या गेट मधनं आत या. तिथे तुम्हाला एक छान tower दिसेल. त्या tower कडे जायला लागा.थोड पुढे आलात की tower दिसल्याचा आनंद होतो न होतो तेव्हढ्यात तुम्हाला एक घाण टाकी दिसेल. तर छान tower आणी घाण टाकी, असं combination दिसलं की तिथनं पुढे या. त्या tower च्या बरोबर खाली माझी केबीन आहे. आणी हो, एवढं करूनही जर सापडलं नाही, तर जरा वेड्यासारखं वागा म्हणजे माझ्याकडे आणून सोडतील!!!"
आम्ही दोघं हसून हसून वेडे झालो. अहो, आमच्यासमोर जन्मात अस कुणी फ़ोनवर बोललं नव्हतं हो!!तुम्ही कल्पना करा,तुम्ही जर असलं काही फ़ोनवर ऎकलं असतत, तर तुमची काय अवस्था झाली असती!!
थोड्या वेळानी college मधली काही मुलं त्यांच्याकडे आली. त्यांना कुठल्यातरी एकांकिकेबद्दल माहिती हवी होती.तेव्हा मोहन आगाशेंनी सरळ नाटककार सतीश आळेकरांना फ़ोन लावला. तिकडनं फ़ोन उचलल्यावर आगाशे म्हणाले," hello, तिकडं सतीश आळेकर आहेत का?"
"हो. आहेत. आपण कोण बोलताय??"
" त्यांना सांगा william shakespeare बोलतोय."
"काय??"
" अहो, ते फ़क्त नाटककारांशी बोलतात अस ऎकलंय. म्हणुन म्हटलं william shakespeare बोलतोय. त्यांना फ़ोन द्या ना जरा..."
त्यानंतरही त्यांना एक दोनदा भेट झाली. एकदा, ते, मी, व माझी मावशी, त्यांच्या गाडीतनं त्यांच्या एका ओळखीच्यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या गाडीमधे काहीतरी बिघाड ज़ाला होता, म्हणुन त्यांनी गाडी garage मधे नेली.तिथे गाडी दुरुस्त करायला थोडा वेळ लागला. तेवढा वेळ आम्ही गाडी बाहेर ऊभे होतो. येणारे जाणारे वळून बघत होते.. 'अरे हेच का रे ते?? "त्रिमुर्ती" मधले??' अशी कुजबुजही कानावर पडल्याचं आठवतं. नंतर आम्ही त्यांच्या गाडीत बसून त्यांच्या ओळखीच्यांच्या office मधे गेलो. तिथे building च्या खाली काही कामगार लोकं सळयांशी काहीतरी ठोकाठोक करत बसले होते. तर आगाशे सर सरळ त्यांच्यापाशी जाऊन त्यांच्या कामाबद्दल माहिती वगैरे विचारायल लागले. आणी वर जाताना त्यांना काही सल्ले ही देउन गेले. असा हा अजब माणुस.
personality अत्यंत जबरदस्तं. म्हणजे ते कुठेही असले तरी वातावरणात भरून असतात.
बोलण्यात अत्यंत मिश्किल.ते बोलत असले की हास्याची कारंजी, नव्हे नव्हे, हास्याचे धबधबे ऊसळत असतात. जास्तं काय लिहू??
असा माणुस आमच्यात पाठवलास, त्याच्यासोबत काही वेळ घालवण्याची संधी दिलीस, ह्याबद्दल देवा, तुझे शतशः आभार!!