Sunday, December 24, 2006

मी टी.व्ही.वर झळकतो.....

वाचून आश्चर्य वाटलं ना? मी? आणि टी.व्ही.वर? काहीतरी काय? पण चमत्कारांवरच दुनिया चालते म्हणतात ना? ते अगदी खरं आहे.खरोख्ररच अस्मादिकांचा चेहरा टी.व्ही.वर झळकलेला आहे( हिमेश ने "झलक दिखलाजा" हे मलाच उद्देशून तर म्हटले नसेल ना?). किंवा पाठ झळकलेली आहे असं म्हणूया हवं तर. नाही कळलं ना? थांबा, मी जरा नीट समजाऊन सांगतो.

आमचे एक स्नेही टी.व्ही. सीरीयल्स मधे काम करतात. एकदा त्यांना भेटायला आम्ही शूटींगच्या लोकेशनवर गेलो होतो. मला वाटतं,दूरदर्शन वरच्या " वीर सावरकर" ह्या मालिकेमधल्या एका एपिसोडचं शूटींग होतं. मदनलाल धिंग्रा एका इंग्रज अधिका-याचा खून करतात तो सीन होता.एका पार्टीमधे हा प्रसंग घडतो. तेव्हा पार्टीचा सेट लावला होता.स्नेह्यांनी आमची दिग्दर्शकांशी ओळख करून दिली.
मदनलाल धिंग्रा पार्टीमधे प्रवेश करतात तो सीन होता.तेव्हा पार्टीमधे गर्दी वाटावी म्हणून दोघ-तिघांना हॉल मधून बाहेर पडताना दाखवावं असं दिग्दर्शकांचं मत पडलं.आम्ही ( म्हणजे, मी आणि माझे बाबा) तिथेच उभे होतो. त्यांनी आम्हाला सहज विचारलं ," तुम्ही करता का हे काम?" आम्ही अर्थातच 'हो' म्हटलं. झालं, लगेच आम्ही कुठला पोषाख घालावा हा शोध सुरू झाला.इंग्रजांची पार्टी असल्याने, आम्हाला दोन कोट मिळाले.पण अजुन एक प्रॉबलेम आलाच. मी नेमक्या पायात चपला घातल्या होत्या. आता वर कोट, आणि खाली चपला? त्यामुळे माझ्यासाठी फॉर्मल बूटांचा शोध सुरू झाला.मी इथे मनातल्या मनात शंभरदा तरी कपाळ बडवलं असेल.बूटापायी आपला हा 'चानस' जातो की काय असं वाटायला लागलं.शेवटी बूट न सापडल्याने, दिग्दर्शकांनी ," ह्यांचे पाय फ्रेम मधे येणार नाहीत असं शूटींग घ्या." असं सांगितलं.
चला! म्हणजे अखेर आम्ही येणार तर कॅमेरापुढे!!आम्हाला काम म्हटलं तर अगदीच नगण्य होतं. दिग्दर्शकांनी 'action' म्हटलं की त्या हॉलच्या दारातून त्यांनी सांगितलेल्या दिशेने कॅमेराच्या फ्रेम मधून बाहेर जाईपर्यंत चालत जायचं, एवढंच होतं. पण तरीही उगीचच छातीत धडधड व्हायला लागली.( एकही संवाद नव्हता,तरीही)आवाज खोल गेला.श्वास गुदमरायला लागला, सर्वांगाला घाम फुटला.थोडक्यात सांगायचं, तर ह्रदयविकाराची सगळी लक्षणे माझ्यात एकदम दिसायला लागली. त्या सीनची एक-दोनदा रीहर्सल झाली. तरीही माझ्या conditon मधे काही फारसा काही फरक पडेना. मी तसाच भांबावल्यासारखा ( म्हणजे नेहमीसारखा) इकडे तिकडे बघत होतो. तरी बरं, कॅमेरा माझ्या मागच्या बाजुने होता. शेवटी एकदाचे दिग्दर्शकांनी 'action' म्हटले बुआ.आणि माझ्या सुदैवाने तो सीन पहिल्याच टेक मधे ओके झाला.मी 'हुश्श' म्हणत पहिल्यांदी तो कोट अंगावरून खाली उतरवला.आयुष्यातला माझा पहिला टी.व्ही.वरचा सीन!

पण त्यामुळे मी आता 'टी.व्ही.वर झळकलेला नवा उमदा चेहरा" अशी माझी ओळख करून देऊ शकतो.पुढे-मागे वधु-वर सूचक मंडळात नाव घालायची पाळी आलीच, तर माझ्या profileमधे "टी.व्ही. सितारा" असं घालायला मी मोकळा आहे. किंवा "सूर्य पाहिलेला माणूस" ह्या धर्तीवर " ज्याची पाठ टी.व्ही. कॅमेराने बघितली आहे असा माणूस" असाही उल्लेख करता येईल. काय, कशी आहे कल्पना?Tuesday, December 19, 2006

पसरा आणि पसारा..

ह्या लेखाचं नाव हे केवळ नाव नसून माझ्या आजवरच्या "जिनगानी"चं ( खरं तर "जीवनगाणे " लिहिणार होतो, पण मग ते अगदीच सखाराम गटणे वाटलं असतं म्हणून...)ब्रीदवाक्य आहे.किंवा माझ्या खोलीचं ब्रीदवाक्य आहे असं म्हणा हवं तर. आजवर मी जी काही बोलणी खाल्ली आहेत, त्यातली निम्मी मी खोली अस्ताव्यस्त असण्याबद्दल खाल्ली आहेत.आधी वाटायचं, की ही खोलीच चुकीची बांधली आहे. म्हणजे, इथे सगळ्या गोष्टी ठेवायच्या जागा फार लांब लांब आहेत.पण मग नंतर एकदा खोली बदलून बघितलं. त्या पण खोलीची जेव्हा आधीसारखीच गत झाली तेव्हा कळलं की प्रॉबलेम आपल्यातच आहे.वास्तविक घरच्यांनी चांगली २ कपाटं, व एक ६ ड्रॉवरचं टेबल त्या खोलीत आणून टाकलं होतं.त्यामुळे सामान ठेवायला इतकी जागा झाली की मी सर्वात जास्ती जवळ असलेल्या कप्प्यात हातातलं सामान ठेवायला लागलो.त्यामुळे गोंधळ कमी व्हायच्या ऎवजी वाढलाच.कुठलाही कप्पा उघडताना अलीबाबाची गुहा उघडताना यावं तसलं फीलिंग यायला लागलं मला.पण तरीही गंमत अशी की शोधायला घेतलेली वस्तू ब-याचदा सापडायचीच. मी न सापडणा-या वस्तू आधी आईला शोधायला सांगायचो. पण ते महागात पडायला लागलं.कारण मला एखादा ड्रॉवर चार-चारदा धुंडाळूनही न सापडलेली वस्तू आई माझ्यासमोर त्याच ड्रॉवर मधनं काढून दाखवायची. मग काय त्यानंतर अव्यवस्थितपणा व वेंधळेपणा ह्या दोन्ही गोष्टींवरून एकदम बोलणी बसायची.फारच चिडली तर ती स्वतःच माझी खोली आवरायची.मग काय, मला एकही वस्तू सापडायची नाही, व सारखं तिला विचारायला लागायचं. पुढे पुढे मी ह्या प्रकाराचा धसका घेतला, व ज्या सापडायलाच पाहिजेत अशा वस्तू तरी सुरक्षित जागी ठेवायला लागलो. लक्षात घ्या, मी " सुरक्षित " म्हटलंय, " व्यवस्थित" नाही.पण एवढे कप्पे असूनही असंख्य वस्तू व खूप सारे कागद माझ्या त्या टेबलावर बापुडवाण्या अवस्थेत पडलेले दिसतात.मी जेव्हा माझी खोली आवरतो,( ह्या क्रियेसाठी इंग्लिश मधला " once in a blue moon" हा वाक्प्रचार वापरायला काहीच हरकत नाही.)तेव्हा घरच्या रद्दीमधे निदान २-३ किलोंची तरी भर पडते.
मी खोली आवरल्यावर किमान २-३ दिवस तरी ती स्वछ वाटते.नंतर हळूच एकेक वस्तू आपापली जागा सोडायला लागते.स्वतःच्याच नकळत स्वतःची खोली पसरण्याच्या क्रियेमधे मी जवळ जवळ mastery केली आहे. म्हणूनच मी फारसा कधी मॆत्रीणिंना घरी वगैरे बोलावत नाही( आम्ही लाख बोलावलं तरी कुठली मैत्रिण येणार आहे आमच्याकडे!!).
सध्या शिक्षणासाठी बाहेर रहात असल्यामुळे जेव्हा घरी येतो आणि माझ्या खोलीतले ड्रॉवर उघडतो तेव्हा मला एकदम nostalgic व्हायला होतं. आपण इतकी टाकून दिली, तरी अजुन एवढी मोडकी पेनं, आणि त्यांच्यापैकी एकालाही फिट न बसणारी टोपणं, हे सगळं आपण कधी गोळा केलं असा प्रश्न पडतो.मग त्या पेनांपाठोपाठ मोडक्या पट्ट्या, करकटक( तेही मोडकंच!) , न चालणारी sketchpens ,एक भिंग, एखादं पेपरवेट, जुने-पुराणे चष्मे, असला एकमेकाशी काहीही संबंध नसलेला ऎवज बाहेर पडतो. And I feel right at home!!

तेव्हा माझी ओळख कोणाला एकाच शब्दात हवी असेल तर मला हा एकच शब्द योग्य दिसतोय..


अस्ताव्यस्त!!!

Tuesday, December 05, 2006

कानडे शशांक " भिभेक "

चाणाक्ष वाचकांनी ओळखलंच असेल की हे शीर्षक म्हणजे शशांकच्या नावाचं U.P. मधलं स्वरूप आहे.हा blog म्हणजे त्याने ह्या( म्हणजे july 2006 ते december 2006) semesterमधे IIT कानपूरमधे जो काही अशक्य माज केलेला आहे( काय ते पुढे येईलच!!) त्याची newton's third law ला अनुसरून एक opposite( but far less than equal!) reaction आहे.
त्याला जर तुम्ही कधी भेटलाच, तर एक मोलाचा सल्ला देऊन ठेवतो.कृपा करून त्याला ह्या semester मधले मार्क विचरू नका.कारण उत्तर ऎकल्यावर तुम्ही निराशेने घेरून जाऊन अभ्यास वगैरे सोडून देऊन बूट-पॉलिश चा धंदा सुरू कराल.किंवा ,"किती पडले?" असं विचारण्याऎवजी ,"किती गेले?" असं विचारा. म्हणजे निदान आपल्या रोजच्या ऎकण्यातले आकडे मिळतील. मला वाटतं, की ह्या semester मधे त्याच्या पाचही विषयाच्या सगळ्याच्या सगळ्या परिक्षा मिळून फारतर ३०-४० मार्क गेले असतील.एका विषयात तर तिन्ही परिक्षेत पैकीच्या पैकी मार्क आहेत! आता तुम्हाला कळलं असेल की मी जो सल्ला दिला आहे त्यात किंचीतही अतिशयोक्ती नाहीये.जिथे जाईल तिथे त्याच्या departmentची पोरं त्याच्याकडे ज्या विस्फारलेल्या नजरेनं बघत असतात, त्यावरून त्यांच्या मनात ह्याची प्रतिमा म्हणजे सिंहासनावर बसलेल्या एखाद्या सम्राटाची असावी असा संशय येतो.
तरी मुलगा वागायला चांगला आहे हो. म्हणजे परिक्षेच्या आधी तोही आमच्यासारखंच ," अरे अभ्यास केला नाहीये अजिबात. उद्या वाट लागणार आहे.." वगैरे बडबड करतो.उगाच आपलं आम्हाला बरं वाटावं म्हणून.आम्ही ह्या कानाने ऎकून त्या कानाने सोडून देतो. अहो, माणूस एकदा-दोनदा फसेल, सारखंच फ़सवायला लागलं कोणी तर कळणारच की!
बरं इतपतच असतं, तरी एकवेळ काही वाटलं नसतं.पण जेव्हा 'ह्याच्याबरोबर फोटो काढून घेण्यात मुलींमधे अहमहमिका लागली होती' हे कळलं,तेव्हा माझा थिजून बर्फ झाला.आणि हा किस्सा शब्दशः खरा आहे, कोणत्याही मीठ-मसाल्याशिवाय. आम्ही फक्तं ष्टो-या ऎकायच्या. हे टिकोजीराव मिटक्या मारत आम्हाला रोज कसे नवनवीन "गड" सर केले ते सांगणार आणि आम्ही 'आ' वासून ऎकणार.सवय लागली आहे हो ह्या semester मधे.जाऊदे, अजून काय काय सांगणार तुम्हाला! ऎकवणार नाही हो ऎकवणार नाही.
चला तर मग.. म्हणा माझ्या मागाहून..
अनंतकोटीब्रह्मांडनायक,

मास्तरसुखदायक ,

ब-यापैकीगायक,

एकमेवलायक..

कानडे शशांक भिभेक की जय!!!!