Sunday, August 26, 2007

मी लई भारी आहे...

to all those narcissists out there, here's my tribue to them...

जग माझी प्रजा, मी त्याचा देव आहे,
मी जगाला मिळालेली, एक अद्भुत ठेव आहे
चेह-यावर तुच्छता, आणि जिभेवर 'च्या मारी' आहे
तरीही मी लई भारी आहे

मी हुशार, मी चतुर, मी साक्षात मदन आहे
माझ्या घराचं नावदेखील "कुबेर सदन" आहे
वाहन माझं सायकल मोडकी, मी तिच्यावरची सवारी आहे,
तरीही मी लई भारी आहे

माझं जीवन इतरांसाठी एक चिरंतन पाठ आहे,
हे न कळणारा एक नंबर माठ आहे
जग जिंकलं असतं मी, पण मला पोसणारी आई तेवढी म्हातारी आहे,
तरीही मी लई भारी आहे.

सारं जग दरिद्री, मी एकटा वैचारिक श्रीमंत आहे,
सारे लोक पापी, मी एकटाच संत आहे,
जेवणानंतर विड्यात घालायला शिल्ल्क फक्त सुपारी आहे,
तरीही मी लई भारी आहे.


मला सा-या जगाचा प्रचंड राग आहे,
दुर्दैव माझं, मी ह्या जगाचा भाग आहे,
माझ्यापेक्षा सुखी , तो रस्त्यावरचा भिकारी आहे,
तरीही मी लई भारी आहे..........