Friday, February 01, 2008

एक सीरियस कविता( :D)!!!

चला आपण करूया, एक सीरियस कविता.

पण अशी ठरवून कविता करता येते?
की काहीही खरडून तिलाच कविता म्हणतात बेटे?
आधी यमकं लिहून, वाक्य नंतर जोडायची,
पसंत न पडलेली लगेच खोडून टाकायची,
तयार होते कविता, स्वतःच स्वतःला हसविता,
चला आपण करूया, एक सीरियस कविता.

सीरियस कवितेसाठी, म्याटर गरमागरम हवा,
जशी पेटलेली चूल, जसा तापलेला तवा.
उदा: "कागदावरच्या शब्दात अर्थ शोधत जीण्याचा"
प्रयत्न करतो मी, अर्थगर्भ लिहीण्याचा"
"दुःखं कशी जमा झाली सुख जमविता जमविता"
चला आपण करूया, एक सीरियस कविता.

हसणं-बिसणं झूठ आहे, शोक तेवढा खरा,
हृदयात कायम हवा, अश्रूंचा एक झरा.
संधी मिळताच तो कागदावर उपडा करायचा,
पण केलाय जणु, वाचकाला रडवून रडवून मारायचा
या लोकी राहून परलोकीच्या चिंतेत कशाला हरविता?
चला आपण करूया, एक सीरियस कविता.

ह्या कवितेत तुम्हाला सीरियस काय दिसलं?
तरी सुद्धा वाचताय ना, सडकछाप काव्य असलं?
पण वाचावसं वाट्तंय, म्हणजे वाचण्यालायक असेल
गालातल्या गालात हसताय, म्हणजे हसण्यालायकही असेल,
शेवटी, करणारे आपण कोण?, देवच करता करविता,
चला आपण करूया, एक सीरियस कविता,
चला आपण करूया, एक सीरियस कविता.