Thursday, January 13, 2011

लोकल मधलं भजन

आज काही कामानिोमित्त सायनला गेलो होतो. काहीसा दमलो होतो. थोडी चिडचिड पण झाली होती कारण थोडासाउशीर झाला होता. परत येताना मला :३४ ची टिटवाळा लोकल मिळाली (माझ्यासारख्या पुणेकराला , ":३२ किंवा :५४ ची लोकल" असली भाषा वापरायला किती त्रास पडतोय ते पुणेकरच जाणे.. असो). डब्यात चढताच खूप मोठ्याने गाण्याचा आवाज ऎकू आला. मला वाटलं कोणाचा तरी मोठ्याने सेल फोन वाजतोय. जरा आत शिरल्यावर दिसलं की तिथे एका कंपार्ट्मेंट मधे बसून, काही लोकं भजन म्हणत होती. त्यांनी खिडकीवर लहानसा कागद सुद्धा लावला होती "हरि ओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ"!

अतिशय तल्लीन होऊन ती लोकं भजनं म्हणत होती. दोघा - तिघांचा आवाज खूपच सुंदर होता. आणि कोरसला आजूबाजूचे सर्व प्रवासी होते. त्यामुळे ध्रुवपदावर आले की अख्खा डबा त्या आवाजाने भरून जायचा. ती भजनं ऎकताना दिवसभराचा सगळा थकवा, त्रास, कटकट, जणू काही एखाद्या धबधब्याने वाहून नेली . नकळत माझेही (बे)सूर कोरसमधे मिसळले. गाता गाताच ज्ञानियांचा राजा भेटला, तो सावळा विठ्ठल भेटला आणि तुकाराममहराज सुद्धा. बर्‍याच दिवसांनी अशी "जमलेली" मैफल ऎकायला मिळाली. त्या सुरांमधे, आणि त्याच्या साथीला असणार्‍या टाळ तबल्यामधे
,‍ ‍ती रेल्वेची गर्दी , उकाडा, धक्कबुक्की, अशा सगळ्या अडचणींना विसरायला लावणारी अद्भूत शक्ती होती. मी कधी वारी केलेली नाही. पण ती मैफल ऎकून एकदातरी तो अनुभव घ्यावासा वाटला. रेल्वे मधे जे फक्त काही मिनिटे अनुभवलं, तो अनुभव अजून जवळून घ्यावा, असं फार फार वाटून गेलं. काही अनुभव मनातल्या एखाद्या लहानशा कुपीत जतन करून ठेवावेसे वाटतात ना, त्यापैकी होता हा.

त्या दिवशी पहिल्यांदाच माझं स्टेशन अपेक्षेपेक्षा खूपच लवकर आलं!!