Tuesday, May 25, 2010

च्यायला, सांगायचं कसं?

मला आज एक मित्र भेटला होता (नाव नका घ्यायला सांगू मैत्रिणींनो!!!) तो जरा hyper झाला होता. त्याला त्याच्या ’झेंगाटा’ला प्रपोज मारायचं होतं, पण ते कसं मारावं ते त्याला कळत नव्हतं. म्हणून तो मला विचारत होता (ह्यावरून त्याची ’चॉईस’ काय असेल ह्याचा अंदाज यावा). त्याच्या त्यावेळच्या मूडवरून सुचलेली ही कविता..

तिला सांगितल्याशिवाय, काही चैन पडत नाही,
न सांगायला, ती काय बहीण लागत नाही,
पण सांगायला गेलो तर,
होईल का हसं?
च्यायला, सांगायचं कसं?

आज तिला सांगायचंच , हा बेत ठरवला,
केसातून कधी नव्हे ते एकदा कंगवा फिरवला,
पण बघितल्यावर तिला,
नुसतं म्हटलं हॅलो कसंबसं,
च्यायला, सांगायचं कसं?

मित्रांनी काय, नुसते दिले फुकटचे सल्ले,
कुणी म्हणे बोकडदाढी, कुणी सुचविले कल्ले,
ह्या सगळ्या येडपटपणात,
माझं कोडं जसंच्या तसं,
च्यायला, सांगायचं कसं?

उद्या सांगू करत एक-एक दिवस सरत चालला,
जाणारा दिवस, अधिक अस्वस्थ करत चालला,
loves me, loves me not करत,
नुसती वाया घालवली पिसं,
च्यायला, सांगायचं कसं?

तिला सांगितलं नाही, तर ती मला कशी मिळणार?
माझ्या मनात काय आहे, तिला कसं कळणार?
प्ण सांगायला गेलो की होतं,
माझं तोंड एवढंसं,
अहो, कुणीतरी सांगा की,
च्यायला, सांगायचं कसं??

- प्रसाद

Wednesday, May 19, 2010

साक्ष..

" काय रे, तुला काय वाटतं? तुच सांग कोण बरोबर?" हे वाक्य ऎकलं की मला धडधडायला लागतं. कारण बहुतेक वेळेला ह्या वाक्यानंतर आई किंवा बाबा, कोणाच्या तरी बाजूने बोलायाला लागतं. त्यांच्या भांडणात हा माझ्यासाठी सर्वात भितीदायक प्रकार. आईच्या बाजूने बोललं, तर बाबा म्हणतात ," तुला रोज सकाळी डबा लागतो ना, तू तिच्याच बाजूने बोलणार." आता वास्तविक आई त्यांना पण इतकी वर्षं डबा करून देत आहे ह्याचा त्यांना सोईस्कररित्या विसर पडतो. बरं बाबांच्या बाजूने बोललं, तर आई म्हणते, " हो, बाप लेक एकत्र येणारच. दोघेही गबाळे एकमेकांना पाठिंबा देतात." (त्यांची भांडणं ही बहुतेक वेळेला काहीतरी काम विसरल्यावरून, किंवा करायचा आळस केल्यावरुन होतात.) आता मान्य आहे , की मी गबाळा आहे. अगदी मान्य आहे. पण त्याचा ह्या भांडणाची काय संबंध? हल्ली हल्ली मी सरळ असं काही व्हायला लागलं की सरळ ," ते तुमचं तुम्ही बघा. उगाच माझी साक्ष काढू नका." असं सांगतो. पण तोही उपाय दरवेळी यशस्वी होत नाही. मी गप्प बसलो म्हणजे माझी विरुद्ध बाजुला सहानुभूती आहे असा दोघेही समज करून घेतात. आणि मग ," एवढं सगळं ऎकतोयस ना? मग जरा मत द्यायला काय होतं?" हे ऎकायला लागतं. मग ते भांडण त्रिकोणी व्हायला लागतं. जी एकुलती एक मुलं आहेत त्यांना मी काय म्हणतोय हे लगेच कळेल. भावंडं असलं तर सोईस्कर विभागणी तरी करता येते. एक भावंडं आईच्या बाजूने आणि एक बाबांच्या. एकटं असलं ही सोय नाही.
त्यातून आई एकदा ओरडायला लागली की मागच्या सगळ्या अपराधांची उजळणी होते. मी आईला किती वेळा सांगितलंय ," मी आत्ता काय चूक केली आहे त्यावरून ओरड. आधीच्या चुकांबद्दल झालंय आधीच झालंय ओरडून. परत परत नाही ओरडायचं त्याच चुकीवरून." तर माझ्या ह्या विधानावरच आक्षेप घेऊन त्यावरून बोलणी सुरू होतात. ह्या सर्वावरून तुम्हाला असं वाटणं सहाजिक आहे की जणू माझे खूप हाल होत आहेत. तसं काही नाहीये, ओरडण्यासारखी परिस्थिती मीच निर्माण करतो हे नाकबूल करून चालणार नाही. पण म्हणून हे काय!!