Thursday, January 13, 2011

लोकल मधलं भजन

आज काही कामानिोमित्त सायनला गेलो होतो. काहीसा दमलो होतो. थोडी चिडचिड पण झाली होती कारण थोडासाउशीर झाला होता. परत येताना मला :३४ ची टिटवाळा लोकल मिळाली (माझ्यासारख्या पुणेकराला , ":३२ किंवा :५४ ची लोकल" असली भाषा वापरायला किती त्रास पडतोय ते पुणेकरच जाणे.. असो). डब्यात चढताच खूप मोठ्याने गाण्याचा आवाज ऎकू आला. मला वाटलं कोणाचा तरी मोठ्याने सेल फोन वाजतोय. जरा आत शिरल्यावर दिसलं की तिथे एका कंपार्ट्मेंट मधे बसून, काही लोकं भजन म्हणत होती. त्यांनी खिडकीवर लहानसा कागद सुद्धा लावला होती "हरि ओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ"!

अतिशय तल्लीन होऊन ती लोकं भजनं म्हणत होती. दोघा - तिघांचा आवाज खूपच सुंदर होता. आणि कोरसला आजूबाजूचे सर्व प्रवासी होते. त्यामुळे ध्रुवपदावर आले की अख्खा डबा त्या आवाजाने भरून जायचा. ती भजनं ऎकताना दिवसभराचा सगळा थकवा, त्रास, कटकट, जणू काही एखाद्या धबधब्याने वाहून नेली . नकळत माझेही (बे)सूर कोरसमधे मिसळले. गाता गाताच ज्ञानियांचा राजा भेटला, तो सावळा विठ्ठल भेटला आणि तुकाराममहराज सुद्धा. बर्‍याच दिवसांनी अशी "जमलेली" मैफल ऎकायला मिळाली. त्या सुरांमधे, आणि त्याच्या साथीला असणार्‍या टाळ तबल्यामधे
,‍ ‍ती रेल्वेची गर्दी , उकाडा, धक्कबुक्की, अशा सगळ्या अडचणींना विसरायला लावणारी अद्भूत शक्ती होती. मी कधी वारी केलेली नाही. पण ती मैफल ऎकून एकदातरी तो अनुभव घ्यावासा वाटला. रेल्वे मधे जे फक्त काही मिनिटे अनुभवलं, तो अनुभव अजून जवळून घ्यावा, असं फार फार वाटून गेलं. काही अनुभव मनातल्या एखाद्या लहानशा कुपीत जतन करून ठेवावेसे वाटतात ना, त्यापैकी होता हा.

त्या दिवशी पहिल्यांदाच माझं स्टेशन अपेक्षेपेक्षा खूपच लवकर आलं!!

Saturday, December 04, 2010

Goggle

परवाच जुन्या आठवणी आवरताना ,

अचानक एक goggle सापडला,

धूळ खात पडला होता बिचारा.

ह्या जुन्या गोष्टींची बरं का, एक गम्मत असते,

ह्यांच्या मेनूकार्डावर, धुळीशिवाय दुसरी कुठलीच वस्तू नसते!

त्याला बाहेर काढून , नीट समोर ठेवला,

माझ्याकडे बघून, तो किंचित हसल्यासारखा भासला.

त्याच्या रिकाम्या डोळ्यात काहीतरी लुकलुकल्यासारख वाटलं,

भूतकाळातल आभाळ, जणू त्याच्या निळ्या काचात दाटलं ..

एकदम काय वाटलं कुणास ठाऊक, उचलला त्याला अन डोळ्यांवर चढवला,

आठवणीच्या हार्ड-डिस्क वरचा सिनेमाच सुरू झाला.

त्याच्या निळ्या काचा, खूपच धूसर झाल्या होत्या,

पण आठवणी मात्र तेवढ्याच स्पष्ट दिसल्या होत्या.....

Monday, October 25, 2010

आचरट!

नुकतेच अरूंधती रॉय चे नवीन आचरट विधान वाचावयास मिळाले. "Jammu and Kashmir was never an integral part of India"!! वाचलं.... डोळे तृप्त झाले. म्हटलं छान चाललंय. हिचे कोणीतरी पूर्वज नक्की पुण्यातले असणार. आपला ज्या विषयाशी काडीमात्रही संबंध नाही अशा विषयावर अशी दणादण मतं, तीही चुकीची, व्यक्तं करायला माणूस पुण्याचाच पाहिजे.

तर अरूंधती रॉयने एकहाती भारतातल्या लोकांची करमणूक करण्याचा वसा उचललेला दिसतोय. काही दिवसांपूर्वी तिने "India is a corporate, Hindu state" असं अजून एक गमतीशीर (खरं तर कानपटीत मारण्यासार्खं) विधान केलं होतं. तरी बरं ती स्वतः ख्रिश्चन आहे. खरंच, लोकांना अशी आचरट बुद्धी देण्यामागे देवाचा काय हेतू असू शकेल? सामान्य माणसाच्या रोजच्या कटकटीतून त्याला थोडातरी विरंगुळा मिळावा अशी इच्छा असावी कदाचित. ती ज्या वेगाने एकापेक्षा एक आचरट विधानं करत चालली आहे, त्या स्पीडने ती ती लवकरच "खरं तर सबंध भारतच पाकिस्तानामधे विलीन करायला हवा होता. लहानसाच पाकिस्तान देण्यामागे हिंदू नेत्यांचा डाव होता." असंही विधान करायला मागेपुढे पहणार नाही. शिरीष कणेकर त्यांच्या फटकेबाजी मधे म्हणतात बघा, " एकदा वात झाला ना माणसाला की काहीही भास व्हायला लागतात."

अशी सनसनाटी विधानं करण्यामगचा काय हेतू असू शकतो? माझ्या मते अरूंधती रॉय ही social activists मधली मल्लिका शेरावत होऊ पहाते आहे. "मल्लिका जेवढी चुंबनं देते त्या पेक्षा जास्त आचरट विधाने मी करूनच दाखवीन", या अट्टहासानेच जणू तिने हे बौद्धिक अंगप्रदर्शन चालवलेलं दिसतंय.(no offense मल्लिका !) ह्यापुढे तिची भाषणांना ’'A" सर्टिफिकेट देण्याची कल्पना कशी वाटते? (A for "Adult' नाही, A for आचरट !) आपण जे बोलतो, त्यामागे थोडातरी अभ्यास हवा, अशी अजिबातच कशी गरज वाटत नाही? अशा मेंदूला पोलिओ झालेल्या लोकांसमोर काय बोलणार आपण? उगाच नाही भारत पोलिओ उच्चाटनामधे अजून मागासलेला आहे !वस्तुस्थिती अशी आहे, की असल्या पोलिओंचं निदान मोठं झाल्यावरच होतं!

काश्मीरवरच्या तिच्या ह्या चिमखड्या बोलांवरून मीडिया मधे त्याची काय रिअ‍ॅक्शन होईल हे काय तिला माहित नसेल? पण मल्लिका शेरावतच्याच तत्वाप्रमाणे ( माझ्याकडॆ दाखविण्यासारखं आहे म्हणून दाखवते !) अरूंधती रॉयने आचरण करायचं ठरवलं असल्यामुळे, शेवटी शेवटी सगळे लोक " कोण अरूंधती रॉय बोलली का? जाऊ दे बिचारी ! तिच्याकडे काय लक्ष द्यायचं?" अशी प्रतिक्रिया द्यायला लागतील. आया आपल्या मुलींना सांगतील, अगं, जरा अभ्यास कर. नाहीतर मोठी झाल्यावर अरूंधती रॉय होशील !"

Thursday, July 08, 2010

वर्गलढा

एकदा आमच्या क्लासमधे,
मुलं जरा जास्ती झाली,
एवढी सगळी मुले आता,
कुठल्याच वर्गात मावेना झाली.

बॅचेस जास्ती, वर्ग कमी,
सोडवायचा कसा हा तिढा,
कार्ल मार्क्सला म्हटलं मी,
’अरे, हाच खरा वर्गलढा’
-प्रसाद

पुनश्च हरि ओम

१५ जुलै! अजून एका नविन ईनिंगची सुरवात! IIT कानपूर सोडल्यानंतर बरोबर २ वर्षांनी पुन्हा IITवासीयाचे जीवन सुरू करणार.. Ph.D. चा विद्यार्थी म्हणून.. लोकांनी ऐकलं की म्हणतात, चाफ्या, तुझे नक्की काय चालू आहे? जरा आमच्या वाटचं पण शिकून घे ना.. कधी UPSC करणार म्हणतोस, आता हे काय नविन? नविन काही नाही. जर दुर्दैवाने UPSC मधे पास झालो नाही तर ISRO किंवा DRDO मधे काम करायची इच्छा आहे, आणि त्यासाठी पुढचं शिक्षण थांबवून चालणार नाही..

दोन्ही अभ्यास कसे झेपणार? कोणास ठाउक? पण झेपतील असं वाटतंय. ह्यामागचं कारण असं असावं की UPSC मधे ह्यावेळी history व Political science हे विषय निवडले आहेत. त्यामुळे तिथे टेक्निकल अभ्यास नाहीये. म्हणजे Ph.D. चा अभ्यास करून कंटाळा आला की UPSC चा करायचा, किंवा उलटं! काय arbit पुस्तकं वाचतोय मी! B.E. किंवा M.Tech करताना, मी कधी "Foundations of Indian Political Thought" अशा नावाचं पुस्तक वाचीन हे कधी स्वप्नात सुध्दा वाटलं नव्हतं. पण मजा येते. मनू, व्यास, वाल्मिकी, कौटिल्य, शुक्राचार्य ह्यांचे राजकीय विचार वाचताना मजा पण येते व अभ्यास पण होतो. राजा अथवा प्रजा, कोण सार्वभौम आहे, ह्याचे निरंतर चिंतन दिसून येते... पण ते एक असो. तो मुख्य विषय नाही.

पुन्हा विद्यार्थीदशेला सुरवात करताना, खूप वेगळं वाटतंय. माहित नाही का, पण भारी वाटतंय. आता अधून मधून घरच्यांचे टोमणे ऐकून घ्यावे लागतात, ’ इतका मोठा झालास, तेव्हाच नोकरी केली असतीस तर एव्हाना लग्न पण झालं असतं'.. ई. ई.. (non-committed लोकांना मी काय म्हणतोय त्याची तीव्रता अधिक जाणवेल.. :) )
पण चलता है!.. पुढे सगळं चांगलं होणार आहे, ह्यावर आज चालत रहायचं, नुसतं चालायचं नाही, हव्या त्या ठिकाणी पोचायचे सडकून प्रयत्न करायचे ह्याशिवाय काय असतं आपल्या हातात, आय मीन, पायात?

Tuesday, May 25, 2010

च्यायला, सांगायचं कसं?

मला आज एक मित्र भेटला होता (नाव नका घ्यायला सांगू मैत्रिणींनो!!!) तो जरा hyper झाला होता. त्याला त्याच्या ’झेंगाटा’ला प्रपोज मारायचं होतं, पण ते कसं मारावं ते त्याला कळत नव्हतं. म्हणून तो मला विचारत होता (ह्यावरून त्याची ’चॉईस’ काय असेल ह्याचा अंदाज यावा). त्याच्या त्यावेळच्या मूडवरून सुचलेली ही कविता..

तिला सांगितल्याशिवाय, काही चैन पडत नाही,
न सांगायला, ती काय बहीण लागत नाही,
पण सांगायला गेलो तर,
होईल का हसं?
च्यायला, सांगायचं कसं?

आज तिला सांगायचंच , हा बेत ठरवला,
केसातून कधी नव्हे ते एकदा कंगवा फिरवला,
पण बघितल्यावर तिला,
नुसतं म्हटलं हॅलो कसंबसं,
च्यायला, सांगायचं कसं?

मित्रांनी काय, नुसते दिले फुकटचे सल्ले,
कुणी म्हणे बोकडदाढी, कुणी सुचविले कल्ले,
ह्या सगळ्या येडपटपणात,
माझं कोडं जसंच्या तसं,
च्यायला, सांगायचं कसं?

उद्या सांगू करत एक-एक दिवस सरत चालला,
जाणारा दिवस, अधिक अस्वस्थ करत चालला,
loves me, loves me not करत,
नुसती वाया घालवली पिसं,
च्यायला, सांगायचं कसं?

तिला सांगितलं नाही, तर ती मला कशी मिळणार?
माझ्या मनात काय आहे, तिला कसं कळणार?
प्ण सांगायला गेलो की होतं,
माझं तोंड एवढंसं,
अहो, कुणीतरी सांगा की,
च्यायला, सांगायचं कसं??

- प्रसाद

Wednesday, May 19, 2010

साक्ष..

" काय रे, तुला काय वाटतं? तुच सांग कोण बरोबर?" हे वाक्य ऎकलं की मला धडधडायला लागतं. कारण बहुतेक वेळेला ह्या वाक्यानंतर आई किंवा बाबा, कोणाच्या तरी बाजूने बोलायाला लागतं. त्यांच्या भांडणात हा माझ्यासाठी सर्वात भितीदायक प्रकार. आईच्या बाजूने बोललं, तर बाबा म्हणतात ," तुला रोज सकाळी डबा लागतो ना, तू तिच्याच बाजूने बोलणार." आता वास्तविक आई त्यांना पण इतकी वर्षं डबा करून देत आहे ह्याचा त्यांना सोईस्कररित्या विसर पडतो. बरं बाबांच्या बाजूने बोललं, तर आई म्हणते, " हो, बाप लेक एकत्र येणारच. दोघेही गबाळे एकमेकांना पाठिंबा देतात." (त्यांची भांडणं ही बहुतेक वेळेला काहीतरी काम विसरल्यावरून, किंवा करायचा आळस केल्यावरुन होतात.) आता मान्य आहे , की मी गबाळा आहे. अगदी मान्य आहे. पण त्याचा ह्या भांडणाची काय संबंध? हल्ली हल्ली मी सरळ असं काही व्हायला लागलं की सरळ ," ते तुमचं तुम्ही बघा. उगाच माझी साक्ष काढू नका." असं सांगतो. पण तोही उपाय दरवेळी यशस्वी होत नाही. मी गप्प बसलो म्हणजे माझी विरुद्ध बाजुला सहानुभूती आहे असा दोघेही समज करून घेतात. आणि मग ," एवढं सगळं ऎकतोयस ना? मग जरा मत द्यायला काय होतं?" हे ऎकायला लागतं. मग ते भांडण त्रिकोणी व्हायला लागतं. जी एकुलती एक मुलं आहेत त्यांना मी काय म्हणतोय हे लगेच कळेल. भावंडं असलं तर सोईस्कर विभागणी तरी करता येते. एक भावंडं आईच्या बाजूने आणि एक बाबांच्या. एकटं असलं ही सोय नाही.
त्यातून आई एकदा ओरडायला लागली की मागच्या सगळ्या अपराधांची उजळणी होते. मी आईला किती वेळा सांगितलंय ," मी आत्ता काय चूक केली आहे त्यावरून ओरड. आधीच्या चुकांबद्दल झालंय आधीच झालंय ओरडून. परत परत नाही ओरडायचं त्याच चुकीवरून." तर माझ्या ह्या विधानावरच आक्षेप घेऊन त्यावरून बोलणी सुरू होतात. ह्या सर्वावरून तुम्हाला असं वाटणं सहाजिक आहे की जणू माझे खूप हाल होत आहेत. तसं काही नाहीये, ओरडण्यासारखी परिस्थिती मीच निर्माण करतो हे नाकबूल करून चालणार नाही. पण म्हणून हे काय!!

Sunday, November 15, 2009

center of confusion

११ नोव्हेंबर २००९. माझ्या यू.पी. एस. सी. च्या मुख्य परिक्षेचा शेवटचा दिवस. माझं सेंटर J.J.School of Arts होतं. परिक्षा ९ वाजता सुरू होणार म्हणून मी ८ वाजल्यापासूनच तिथे जाऊन थांबलो होतो.बघतो तर मी तिथे एकटाच! काय होतं, की मी जो optional विषय निवडला होता त्याला खूप कमी लोकं निवडतात. म्हणून मला वाटलं की कदाचित आता नाही पण थोड्या वेळात कोणीतरी येईल. मी एकदोघांना फोन पण केले, ही गंमत सांगायला, की बघा, मी एकटाच आहे परिक्षा द्यायला!! खरी माझीच गंमत होणार हे तेव्हा मला माहित नव्हतं.

पुन्हा जरा वेळाने मी hall-ticket काढून पाहिलं. ते नीट वाचलं, आणि माझे डोळेच फिरले!! आत्तापर्यंत कधीही झाली नव्हती अशी गोची झाली होती! मी चुकीच्या सेंटरला आलो होतो! वर्षभराची मेहनत आत केवळ सेंटर चुकल्यामुळे वाया जाणार की काय असं वाटायला लागलं. म्हणजे झालं काय होतं, hall ticket वर लिहिलं होतं की ०५,०६,०७,०८,०९ व १०/११/२००९ रोजी J.J.School ला परिक्षा, व इतर दिवशी Govt. Law College Churchgate इथे परिक्षा होणार आहे. ते १०/११ म्हणजे १० नोव्हेंबर असं होतं. ते मला १० व ११ नोव्हेंबर असं वाटलं होतं! मी जे हादरलो, अंगातले सगळे अवयव थरथर कापायला लागले.कसाबसा taxi थांबवण्यासाठी घसा मोकळा केला. पण पहिली काही मिनिटं तीही थांबेना. अक्षरशः हात जोडून मी विनंती करत होतो. सर्वांगाला घाम फुटला होता. तिथे एक taxiवाला थांबला होता, पण त्याचं एक गि-हाईक येणार असल्यामुळे तो मला सोडू शकत नव्ह्ता. शेवटी त्यानेच एका taxiला थांबवून मला चर्चगेट ला सोडण्याची विनंती केली. त्याही taxiवाल्याला कुठेतरी दुसरीकडे जायचं होतं, पण कसाबसा तो तयार झाला. सुदैवाने CST ते चर्चगेट हा रस्ता वाहनाने ५ मिनिटांचा आहे. ८:१५ ला मला कळल्यापसून मी १० मिनिटात त्या सेंटरला पोचलो व पु.लं.नी लिहिल्याप्रमाणे "आपल्या पोटात एक भांडे आहे. त्यात जीव नावाची वस्तू पडल्यावर थंडगार वाटत्ते" तसा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला.पण आजही ’ जर ते दुसरम सेंटर दादर किंवा दुस-या कुठल्यातरी सबर्ब मधे असतं तर काय’ ह्या विचाराने पोटात धस्सं होतं!!